Monday, April 22, 2013

काव्यरत्नावली: मराठीचा काव्यवृक्ष!

मराठेशाही संपुष्टात येऊन इंग्रजी राज्य आल्यापासून समाजजीवनात अभूतपूर्व परिवर्तन झाले. ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या मुंबई विद्यापीठातून बाहेर पडलेल्या तरुणांनी उपजीविका चालवण्यासाठी नोकरी करता करता वर्तमानपत्रे सुरू केली. इतिहाससंशोधन, जुन्या संस्कृत-प्राकृत पोथ्या शोधून काढून त्यांचे अर्थविवरण आणि त्यावर विस्तृत भाष्य लिहीण्याचे कार्य मराठी लेखकांनी मोठ्या जोमाने सुरू केले.
 
मराठीत नुकत्याच निघू लागलेल्या  नियतकालिकांनीही ह्या संशोधनपर लेखनास प्रसिध्दी देऊन फार मोठा हातभार लावला. जनजागृती हा प्रधान उद्देश केसरीसारख्या वर्तमानपत्राचा होता तर प्रबोधन, साहित्य-शास्त्र मनोरंजन अशी विविध उद्दिष्ट्ये ठेवणा-या नियतकालिकांची संख्याही कमी नव्हती. 1832 साली बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण नावाचे वर्तमानपत्र सुरू केले. त्यांच्याही आधी कोण्या मिशन-याने मराठी वर्तमानपत्र सुरू केले होते म्हणतात. पण ह्या नियतकालिकाच्या कोणताच पुरावा अस्तित्वात नाही. पण एक मात्र खरे की 1832 पासून पन्नास वर्षात महाराष्ट्रात जी अनेक नियतकालिके सुरू झाली त्यात खानदेशातील जळगाव येथे काव्यरत्नावली ह्या संपूर्णपणे कवितेला वाहिलेल्या  वैशिष्ट्यपूर्ण नियतकालिकचे स्थान अनन्यसाधारण आहे. ह्या मासिकाने मराठी कवितेचा इतिहास घडवला हे सांगूनही आज कोणाला खरे वाटणार नाही. 1862 साली जन्मलेले नारायण नरसिंह फडणीस उर्फ नानासाहेब फडणीस ह्यांनी जळगावसारख्या पुण्यापासून (पुणे हे त्या काळी विव्दत्तेचे केंद्र होते.) लांब असलेल्या गावात छापखाना काढला. पाठोपाठ त्यांनी 1880 साली (काँग्रेसच्या स्थापनेच्या आधी! ) प्रबोधचंद्रिका तर 1887 साली काव्यरत्नावली ही दोन नियतकालिके सुरू केली. प्रबोधचंद्रिका हे तर उघड उघड टिळकांच्या राजकारणाचा पुरस्कार करण्यासाठी होते.
 
नानासाहेबांचे शिक्षण फारसे नव्हते. जळगाव येथील राममंदिरात त्यांची बाबजी नावाच्या कोणा सत्पुरूषाची त्यांची गाठ पडली असावी. ह्याच बाबजी महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. जळगावचे सुप्रसिद्ध अप्पामहाराज (त्यांची समाधी जळगावमध्ये आहे.), लालखाँ मिय्या ह्यांनाही बाबजी महाराजांचा अनुग्रह(?) झाला होता. त्यामुळे ह्या तिघा मित्रांच्या रोज भेटी व्हायच्या अप्पामहाराजांनी रथोत्सव सुरू करून आध्यात्मिक क्षेत्रात मोठीच भरारी मारली तर लालखाँ मिय्यांनीदेखील शनि पेठेत एक मशीद बांधून करून मुस्लिम समाजतल्या मंडळींचे आध्यात्मिक उन्नयन करण्याचे काम सुरू केले.
 
नानासाहेबांनी मात्र ह्या दोघांपेक्षा वेगळा मार्ग चोखाळला. त्यांनी छापखाना काढण्याचे ठरवले. ही प्रेरणा त्यांना बहुधा बाबजीमहाराजांकडून   मिळाली असावी. त्यांनी आपल्या छापखान्यास आधी जगद्गुरू प्रेस असे नाव दिले होते. परंतु नंतर बदलून ते त्यांनी बाबजी प्रिंटिंग प्रेस असे केले. बाबजी प्रिंटिंग प्रेस ह्या नावात त्यांची गुरुवरील निष्ठा व्यक्त होते. त्या काळात म्हणजे 1872च्या सुमारास केवळ जळगावमध्येच नव्हे तर खानदेशात शिळाप्रेस काढण्याचे धाडस कोणीच केले नव्हते. नानासाहेबांनी ते धाडस केले. त्यामुळे त्यांचा छापखाना पाहणे हा जळगावमध्ये कौतुकाचा विषय होता. त्यांचा छापखाना पाहण्यासाठी अनेकजण जात. बहिणाबाईं चौधरी ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या कवयित्रीनेही शेतावर जातायेता ही छापखाना पाहिला होता. त्यावर त्यांनी पुढे ह्या छापखान्यावर मार्मिक कविताच लिहीली होती. मंत्रामुळे एखादा भगत घुमू लागतो तसे छाप्याचं यंत्र घुमू लागते असे विनोदी वर्णन नानासाहेबांच्या छापखान्याचे बहिणाबाईंनी केले आहे. मानसापरी मानूस राहतो रे येडजाना अरे व्हतो छापीसनी कोरा कागद शहाना  असा शेवट करून त्यांनी मोठे मार्मिक भाष्य केले आहे. निरक्षर असलेल्या बहिणाबाईंच्या ह्या ओळी त्यांच्या प्रतिभेची साक्ष देणा-या आहेत.
 
नानासाहेब फडणीसांनी छापखाना सुरू केल्यानंतरच्या काळात राजकीय स्वातंत्र्याचे वारे जोराने वाहू लागले होते. वा-याची दिशा ओळखून त्यांनी प्रबोधचंद्रिका हे साप्ताहिक सुरू केलेच होते. एकदा त्यांच्याकडे एक मुस्लीम गृहस्थ आला. मला शायरीचे मासिक प्रसिद्ध करायचे आहे, असे त्याने सांगितले. त्याचे मासिक छापून देण्याचे नानासाहेबांनी मान्यही केले. तुम्ही साहित्य कसे मिळवणार वगैरे त्या गृहस्थाला विचारल्यावर तो म्हणाला मी उत्तर भारतात उर्दूत कविता लिहीणारे अनेक कवी आहेत. त्यांच्याकडून मला शायरीचा पुरवठा होत राहील, त्यात काहीच अडचण नाही, असे त्या गृहस्थाने सांगितले. पण तो गृहस्थ पुन्हा परत आलाच नाही. जाता जाता तो गृहस्थ नानासाहेबांच्या मनात काव्याला वाहिलेले मासिक सुरू करण्याचे बीज रोवून गेला. मात्र, अशा प्रकारचे मासिक सुरू व्हायला 1887चा जून महिना उजाडावा लागला. त्यांनी सुरू केलेल्या काव्यरत्नावलीच्या पहिल्या अंकाची किंमत चार आणे होती तर वार्षिक वर्गणी दीड रुपया!
 
काव्यरत्नावलीने अर्वाचीन मराठी कवितेचा प्रवाह जन्माला घातला. नाटक, कादंबरी आणि काव्य ह्या तिन्ही शाखांतून मराठी साहित्याचा जो अखंड प्रवाह सुरू झाला. केशवसुतांनी कवितेचे वळण बदलून टाकले. जुन्या बाळबोध वळणाच्या अभंगवजा कवितेचा फॉर्म केशवसुतांनी आमूलाग्र बदलून करून टाकला. शेक्सपियरच्या सॉनेटच्या धर्तीवर त्यांनी शार्दूलविक्रीडात सुनीते लिहीण्यास सुरूवात केली. नानासाहेबांनी सुरू केलेल्या काव्यरत्नावली मासिकाचा प्लॅटफार्म आयताच त्यांना उपलब्ध झाला. थेट उपदेश करण्याच्या काव्यलेखनाच्या फॉर्ममध्येकाव्यप्रांतात मन्वंतरच घडवले. त्यांची कविता जास्तीत जास्त आशयगर्भ झाली. मुख्य म्हणजे नवनीतचा ठसा पुसला गेला. केशवसुतांच्या गाजलेल्या बहुतेक कविता काव्यरत्नावलीतून प्रसिद्ध झालेल्या आहेत.
केशवसुतापासून माधव ज्युलियनांपर्यंत तीस-चाळीस वर्षात मराठीतील बहुतेक कवींच्या अनेक कविता काव्यरत्नावलीत प्रसिध्द झाल्या. प्रेमाचे शाहीर गोविंदाग्रज, त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी (फुलराणी ही सुप्रसिद्ध कविता प्रसवणारे), रेंदाळकर, भा. रा. तांबे, यशवंत, गिरीश, सोपानदेव चौधरी, केशवकुमार (आचार्य अत्रे). कवि दत्त, शाहीर दूर्गाप्रसाद आसाराम तिवारी (मराठ्यांची संग्रामगीते, झाशीची संग्रामगीते) इत्यादि अनेक कवींच्या कविता काव्यरत्नावलीतून प्रसिद्ध झाल्या.
काव्यरत्नावलीने निरनिराळ्या कवींच्या मिळून एक लाखांहून अधिक कविता प्रसिद्ध केल्या. मला वाटते, हा एक विक्रम असावा. ह्या कवितांवर काव्य रसिकात चर्चाही चालत. अर्थात ती चर्चा त्या काळाला अनुरूप अशा त्यांच्या वैयक्तिक पत्रव्यवहराच्या माध्यमातून चालत असे. ह्याच काळात नाटक आणि कादंबरी हेही प्रांत समृध्द होत गेले. ह. ना. आपटे, ना. ह. आपटे, नाथमाधव वगैरे अनेक लेखकांच्या कादंब-या आणि गडकरी-कोल्हटकर ह्यंची नाटकेही ह्याच काळात लिहीली 1905 ते 1930  ह्या काळात मराठी साहित्याच्या पाया घातला गेला. ह्या दृष्टीने पाहिले तर काव्यरत्नावलीने मराठी साहित्याला दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे.
 
काव्यरत्नावलीकारांचे निधन झाले तरी मराठी कवितेशी असलेले जळगावचे नाते पुढेही कायम राहिले. सानेगुरूजींच्या रूपाने एक मोठा कवी-कथालेखक खानदेशला लाभला. नवकवितेचे जनक बा. सी मर्ढेकर हेही जळगावच्या जी. एस हायस्कूलमध्ये शिकायला होते. त्यांनी मुक्तछंदात्मक नवकविता लिहून मराठी कवितेच्या प्रांतात आपला स्वत:चा झेंडा फडकवला. बहिणाबाईंच्या कवितेला आचार्य अत्रे ह्यांनी उचलून धरले नसते तर बहिणाबाईंची ओळख महाराष्ट्राला झाली असती की नाही ह्याबद्द्ल शंका वाटते. ना. धों महानोर ह्यांच्या रानातल्या कवितेला महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. ज्या अजिंठ्या तालुक्यात महानोरांचे शेत, गाव आहे ते नकाशाच्या दृष्टीने औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा तालुक्यात असले तर नाधोंचे वास्तव्य मात्र जळगावलाच आहे. ते जळगावला आपला समजतात अन् जळगावही त्यांना आपलाच मानते! खळबळजनक कादंब-या लिहून नावारूपाला आलेले कादंबरीकार भालचंद्र नेमाडे हेही जळगावचेच! सांगायचा मुद्दा एवढाच की काव्यरत्नावलीकारांनी लावलेल्या कवितारूपी वटवृक्षाच्या पारंब्या महाराष्ट्रभर  पसरल्या आहेत.

जळगावात मारूती पेठेत, जो भाग, आता जुने जळगाव म्हणून ओळखला जातो. जुन्या जळगावात सुरू झालेल्या कवितेच्या चळवळीचा आजच्या मराठी साहित्यिकांना जवळ जवळ विस्मरण झाले आहे. नानासाहेबांच्या नावाने एखादे म्युझियम काढून त्यात मराठी कवितांची मूळ हस्तलिखिते संग्रहित करणारे काव्यरत्नावलीकारांचे स्मारक करण्याची खरे तर गरज आहे. महाराष्ट्र शासनाला करता आले असते. मराठी  साहित्य संमेलनालाही काही करावेसे वाटले नाही. जळगाव महापालिकेकडूनही काय अपेक्षा व्यक्त करणार! जळगाव शहरातल्या एका चौकाला काव्यरत्नावली चौकअसे नाव देऊन श्राद्ध उरकावे तसा जळगाव पालिकेने हा विषय आपल्यापुरता संपवला. काळाच्या ओघात बाबजी छापखाना नानसाहेबांच्या चिरंजीवांनी मारूती पेठेतून बळिराम पेठेत हलवला. छापखान्याची मूळ जागा कधीच रस्ता रूंदीकरणात गेली आहे.
काव्यरत्नावली बंद पडले. प्रबोधचंद्रिकामात्र तग धरून आहे. विशेष म्हणजे आजच्या संगणकयुगातही हा छापखाना मात्र सुरू आहे. काव्यरत्नावलीकारांचे नातू व्यंकटेश फडणीस हे बाबजी प्रेस मालक असून ते हा छापखाना चालवतात. ते काही काळ मराठाचे जळगावचे वार्ताहर होते. प्रिंटिंग प्रेस, कवितेला वाहिलेले मासिक, स्वातंत्र्य चळवळीचा पुरस्कार करणारे साप्ताहिक एवढा सगळा अहर्निश उद्योग करूनही नानासाहेबांना फार मोठी इस्टेट करता आली नाही. अनेक कर्तबगार व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या इस्टेटीची वाटणी होते. तशी ती नानासाहेबांच्या इस्टेटीचीही झाली! प्रबोधचंद्रिका साप्ताहिक नानासाहेबांच्या एका मुलाकडे गेले तर दुस-या मुलाकडे काव्यरत्नावलीचे अधिकार आले! बंद पडलेल्या काव्यरत्नावलीचे अधिकार सध्या व्यंकटेश फडणीस ह्यांच्याकडे आहेत. हिस्सेवाटणीत मिळालेली अशी ही अजब इस्टेट बाळगणारा महाराष्ट्रात अन्य कोणी नसेल! प्रबोधचंद्रिका त्यांचे चुलत बंधू श्रीनिवास फडणीस ह्यांच्याकडे आहेत. अशी ही मराठी काव्यवृक्षाची ही आगळीवेगळी कथा.
भूतपूर्वसहसंपादक, लोकसत्ता